लातूरमध्ये सोयाबीन काढणीवर पावसाचे संकट

पीक काढणीला येत असताना पीकांवर पावसाचे संकटाचे सावट आहे. काही काळ खंड दिलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतामधील सोयाबीन पिकाचे व काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे तर पिक काढणीला पावसामुळे अडचण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात नैराश्य निर्माण झाले आहे.

परिसरात मागे तीन आठवडे सतत झालेल्या पावसामुळे अगोदरच सोयाबीन पिकात पाणी साठले आहे. त्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दोन वर्षापासून सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने व याही वर्षी पावसामुळे हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात अगोदरच निराशा पसरली होती. डोक्यावरील कर्जाचा वाढता डोंगर अजूनही वाढतच चालला आहे. मागील वर्षी परिसरातील शेतकर्‍यांना पीक विम्याच्या नावाखाली कंपनीकडून चार – पाच रुपये देऊन थट्टाच केली गेली. त्यातही सोयाबीनचा भाव दोन वर्षापासून पाच हजार रुपयांच्या वर जात नसल्यामुळे शेतीमध्ये खर्च करणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले आहे. या वर्षीही शेंग भरणीच्या वेळी सोयाबीनवर मर रोग, तसेच अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. जमिनीत साठलेल्या पाण्यामुळे पीक पिवळे पडले त्यामुळेही पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्ष सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी तरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल या बेभरवशाच्या अपेक्षेपोटी तो सोयाबीन काढणीच्या धावपळीला लागला असतानाच एक महिन्यापासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार सुरुवात केली आहे. यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. काढलेले सोयाबीन सुध्दा पाण्यात बुडाले आहे. त्यातच पिकात पाणी साचल्याने व पावसाने पीक काढणीस मोठ्या अडचणी येत आहेत.

या वर्षी तरी योग्य भाव मिळेल, ही खोटी अपेक्षा मनात ठेऊन जोमाने काढणीला लागलेला शेतकरी मात्र आता पावसामुळे झालेल्या उत्पादन घटीच्या दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे परिसरातील सोयाबीन काढणी थांबली असून, अजुनही पावसाचे संकट काढणीवर घोंगावत आहे. सततची नापिकी, रोगराई आणि अस्मानी-सुलतानी संकटामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना योग्य भाव व सरसकट कर्जमाफी मिळेल का.? अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून होताना दिसत आहे.