रायगडात साखर चौथ गणपती विराजमान

माघ महिन्यात गणेश जयंतीला अनेकजण आपल्या घरात लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करतात. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सर्वत्रच आगमन झालेल्या बाप्पाला जड अंतकरणाने भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. मात्र रायगडात प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या चार दिवसांनंतर साखर चौथ गणपतीचे आगमन झाले असून कल्याण, पनवेल, पेण, नागोठण्यासह अनेक ठिकाणी बाप्पाचा जयघोष सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कल्याण, पनवेल, पेण, रोहे, अलिबाग या भागांत साखर चौथ गणपतीचे आगमन होते. पनवेल शहरात 68 साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत. नागोठणे येथेही शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, शिवसैनिक राजेंद्र पिताणी, दिनेश जैन, संजय तळेकर यांच्याकडेही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. मुरुडच्या नांदगाव येथे शिवशाही प्रतिष्ठानने नांदगावचा विघ्नहर्ता साखर चौथ गणपतीची स्थापना केली आहे. टाळा येथील शिक्षण प्रसारकी मंडळाने लाडक्या बापाची स्थापना केली आहे. साखर चौथ गणपती दीड, अडीच तर काही ठिकाणी पाच दिवसांचेही असतात.

शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, सचिव महेंद्र माने, सदस्य नारायण म्हात्रे, अर्चित भिसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.