भाजप-मिंधेमध्ये वादाचा ताशा कडाडला; रवींद्र चव्हाणांच्या ‘हॅप्पी खड्डे’चे बॅनर मिंधेंच्या दीपेश म्हात्रेनी लावले

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या ‘हॅप्पी खड्डे डोंबिवलीकर’ हे बॅनर्स मिंधे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी लावले होते. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जॉली प्रिंटरच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हे सत्य उघडकीस आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मिंधे गट आणि भाजपमध्ये वादाचा ताशा कडाडल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

20 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने अनेक ठिकाणी त्यांचे समर्थकांनी बॅनर लावले होते. मात्र डोंबिवली पश्चिमेत काही ठिकाणी त्यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बॅनर छापणाऱ्या जॉली प्रिंटरच्या कर्मचाऱ्यांवर शहर विद्रुपीकरण आणि सामाजिक तेढ निर्माण करून मंत्र्यांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पोलिसांनी तपास केला असता, त्यात हे बॅनर डोंबिवलीतील मिंधे गटाचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी लावण्यास सांगितले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

प्रकरण अंगलट आले
चव्हाण आणि म्हात्रे यांच्यातील वाद हा खूप जुनाच आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या नेहमीच करत असतात. त्यात आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरून तर त्यांच्यातील वाद आणखीच पेटला असून चव्हाण यांना लक्ष्य करण्याची एकही संधी मिंधे गटाकडून सोडली जात नाही. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर प्रकरण म्हात्रे यांच्या अंगाशी आले आहे. म्हात्रे यांच्यावर पोलीस आता काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.