मुंब्र्यात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुकली ठार; तिघे जखमी

मुंब्र्याच्या जीवनबाग येथील बानू टॉवरमध्ये असलेल्या बी विंगमधील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून पाच वर्षांची चिमुकली ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. उनेजा शेख असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे मुंब्यातील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्त घर सील केले आहे.

मुंब्रा येथील जीवनबाग येथे बानू टॉवर ही तळ अधिक 5 मजली इमारत आहे. ती इमारत 30 वर्षे जुनी असून त्यात एकून 20 सदनिका व 6 गाळे आहेत. ही इमारत सी 2 बी प्रवर्गात येत असून संबंधित रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या तर इमारतीच्या बी विंगमधील तळ मजल्यावरील रूम नं. 1 हा अस्लम कुरैशी यांच्या मालकीचा असून तेथे उमर शेख हे भाडेकरू आहेत. ते आपली पत्नी मुस्कान, मुलगी उनेजा व मुलगा इजाज यांच्यासोबत राहतात.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उमर शेख यांच्या घराच्या किचनमधील स्लॅबचे प्लास्टर अचानक पडले. त्यामध्ये उनेजा ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने बुऱ्हाणी रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उनेजा हिला मृत घोषित केले. या दुर्घटनेत उमरसह पत्नी मुस्कान व मुलगा इजाज हे तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याने जीवनबाग परिसरातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदनिका सील

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली होती. तसेच सदर सदनिका रिकामी करून सील करण्यात आली असून त्यानुसार उर्वरित कार्यवाही बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार आहे.