श्रीलंकेच्या अध्यक्षपदी अनुरा दिसानायके, विद्यमान अध्यक्ष विक्रमसिंघे तिसऱ्या क्रमाकांवर

श्रीलंकेच्या अध्यक्षपदी प्रथमच मार्क्सवादी नेते अनुरा पुमारा दिसानायके तथा एकेडी हे निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाने आज दुसऱ्यांदा केलेल्या मतमोजणीअंती पीपल्स लिबरेशन फ्रंटचे दिसानायके यांना विजयी घोषित केले. कोलंबो येथील अध्यक्षीय सचिवालयात एका साध्या समारंभात दिसानायके यांना सोमवारी पदाची शपथ दिली जाईल. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सजिथ प्रेमदासा यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना पहिल्या फेरीत्पील मतमोजणीत पहिल्या दोनमध्येही स्थान मिळू शकले नाही. श्रीलंकेचे भवितव्य आता तुमच्या हातात सोपवत असल्याचे सांगत विक्रमसिंघे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कर्जफेडीचे आव्हान

आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेसमोर कर्जफेडीचे मोठे आव्हान आहे. विक्रमसिंघे यांनी या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी काही दुप्पट आयकरासह काही आर्थिक निर्बंध प्रस्तावित केले होते. आता दिसानायके यांना ही परिस्थिती हाताळायची आहे. नाणेनिधी कराराला आमचा विरोध नाही, पण आम्ही त्यात खचितच सुधारणा करू, असे त्यांच्या पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्याने एएफपीला सांगितले.

शेतकऱ्याचा मुलगा झाला अध्यक्ष

आम्ही शतकानुशतके जोपासलेलं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. आम्ही एकत्रितपणे श्रीलंकेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्यास तयार आहोत, असे दिसानायके यांनी विजयाच्या घोषणेनंतर एक्सवर पोस्ट केले होते. सर्वसामान्य शेतकरी पुटुंबातील दिसानायके हे 2000 पासून संसदेचे सदस्य आहेत आणि यापूर्वीही त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आहे. एका सर्वसामान्य शेतकरी पुटुंबातील मुलगा देशाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.