राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार; कोकण, मराठवाडय़ाला खबरदारीचा अलर्ट

अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेला पाऊस मुंबईमहाराष्ट्राच्या विविध भागात पुन्हा डेरेदाखल होणार आहे. यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून कोकण, मराठवाडय़ाला हवामान खात्याकडून खबरदारीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे पिकांनाही धोका असल्याने पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागांत मध्यम व  जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच 24 सप्टेंबरला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र घाट भागात, कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी राहणार स्थिती

z सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

z अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. मराठवाडय़ात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.

z नांदेडमध्ये कंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून पुढाल दोन दिवस नांदेड जिह्यात ‘यलो अलर्ट’ जारी दिला आहे. परभणीत पावसाला सुरुवात झाली आहे.

पाच दिवस जोरदार!

समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट भागात, कोकणात काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.