तुरुंगात असताना मुलाची फी भरायला लोकांकडे भीक मागावी लागली

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया जवळपास दीड वर्ष तुरुंगात होते. या कालावधीत मला माझ्या मुलाची शाळेची फी भरायला पैसे नव्हते. त्यासाठी लोकांकडे अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली, अशा शब्दांत सिसोदिया यांनी खंत व्यक्त केली आहे. आज आम आदमी पक्षाच्या एका सभेला संबोधित करताना सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षासह केंद्रीय तपास यंत्रणांवरही गंभीर आरोप केले.

तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मलाही भडकवण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांच्यापासून मला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला सांगण्यात आले की, अरविंद केजरीवाल यांनी तुमचे नाव घेतले. आता तुम्हीदेखील केजरीवाल यांचे नाव घ्या. असे केले तर तुमचा यातून बचाव होईल, असा आरोपही सिसोदिया यांनी केला.