महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार? आदित्य ठाकरेंचा सवाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई दौऱयावर येत आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. पण राज्याला पूर्णवेळ निवडणूक आयुक्त नाही. राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण हे कोणाला माहीत आहे का? आणि त्यांची नियुक्ती केव्हा झाली? अशी प्रश्नांची सरबत्ती शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’च्या माध्यमातून राज्य सरकारवर केली.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान हे 5 सप्टेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना स्वेच्छानिवृत्तीस भाग पाडून मदान यांच्या निवृत्तीने झालेल्या रिक्त पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्याचा घाट महायुती सरकारने रचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

काय म्हटले आहे ‘एक्स’च्या पोस्टमध्ये

z सध्या आयोगाचे सचिव हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या निवडणुकीचे कामकाज पाहतील, पण महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात मतदान होत असताना पूर्णवेळ आयुक्त का नाही?

z 5 सप्टेंबर रोजी मदान यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि या पदावर त्यांची नियुक्ती करण्यासाठी विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

z जेव्हा आम्ही ते निदर्शनास आणले तेव्हा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना कोणतेही बदल केले जाणार नाहीत असे संकेत देण्यासाठी सुजाता सौनिक यांचे कौतुक करावे लागले. परंतु आम्ही पुन्हा ऐकतोय की, मुख्य सचिवांवर राजीनामा देण्यासाठी दबाव आहे.

z तुमच्याकडे त्यांची बदली करण्याची ताकद असताना, पण तसे करण्याची हिंमत नसताना त्यांना निवृत्त होण्यास का भाग पाडता?

z निवडणूक आयुक्त या आठवडय़ात महाराष्ट्राच्या दौऱयावर येत आहेत, पण राज्याला मुख्य निवडणूक आयुक्त नाही..

वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा केली आहे, पण राज्याचा निवडणूक आयुक्त नसल्याकडे लक्ष वेधत वन नेशन, वन इलेक्शनच्या मुद्दय़ावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारची खिल्ली उडवली आहे.