3 ऑक्टोबरला देशभरात रेल्वेचा चक्का जाम करणार, हरयाणातील महापंचायतीत घोषणा

किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मोदी सरकारने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या 3 ऑक्टोबरला देशभरात रेल्वेचा चक्का जाम करण्यात येणार आहे. या दिवशी हरयाणातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाविरोधात वज्रमूठ आवळण्यात येणार असून निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवण्याचा दृढनिश्चय करण्यात येणार आहे. शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापंचायतीत ही घोषणा करण्यात आली. महापंचायतीत हजारो शेतकऱ्यांचे अक्षरशः वादळ घोंघावले. मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोदी सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराचा बदला आता शेतकरी घेणार आहेत. 3 ऑक्टोबरला हरयाणातील प्रत्येक गावात सभा घेऊन मोदी सरकारने कशा प्रकारे शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार केले, गोळीबार केला, शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याची आठवण शेतकऱ्यांना करून देण्यात येणार असल्याचे पंधेर यांनी सांगितले.

z आज पिपली येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. याआधी जिंदमध्येही महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राज्यांतील शेतकरी उपस्थित होते. दिल्लीतील सीमा उघडण्यासोबतच विविध मागण्यांबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले.

z पिकांना किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन करत आहेत. मोठय़ा संख्येने शेतकरी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसले असून सुरक्षेचे कारस्थान पुढे करून बॅरिकेड्स लावून दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

 दोन तास रेल्वेगाडय़ा रोखून धरणार

3 ऑक्टोबर रोजी देशभरात रेल्वेगाडय़ा तब्बल दोन तास रोखून धरण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी सांगितले. येणाऱ्या काळात शेतकरी आंदोलन आणखी रौद्र रूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सत्तेवर आलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांवर अन्याय केला तर त्यांच्याविरोधात शेतकरी एकत्र लढून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही पंधेर म्हणाले.