कामाच्या अतिताणामुळे इंजिनीयरची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या

चेन्नईत एका इंजिनीयर तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे किंवा मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मूळचा तामीळनाडूमधील थेनी जिह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईतल राहत होता. त्याला 10 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. विजेचा शॉक घेऊन कार्तिकेयनने जीवन संपवले.

कार्तिकेयन नैराश्यात गेल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते. घटनेच्या वेळी तो एकटाच घरी होता. त्याची पत्नी के. जयरानी सोमवारी चेन्नईपासून 300 किमी अंतरावरील विरुनाल्लूर मंदिरात गेली होती. रात्री ती घरी परतली. तेव्हा कार्तिकेयनचा मृतदेह दिसला. त्याने शरीराभोवती करंट असलेली वायर गुंडाळून आत्महत्या केल्याचे समोर आले.

पुण्यात सीए तरुणीचा मृत्यू

अन्सर्ट अँड यंग या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सीए तरुणीचा अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अॅना सेबास्टियन रेरायिल (26) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.