घरभाडे घेणाऱ्या शेवगावातील पाच शिक्षकांकडून 10 लाख वसूल करा, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडूनही कायम

मुख्यालयात न राहता घरभाडे घेण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील पाच शिक्षकांच्या अंगलट आला आहे. शेवगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱयांनी पाचही शिक्षकांकडून घरभाडय़ापोटी घेतलेली सुमारे दहा लाखांची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला आहे. या विरोधात या शिक्षकांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे अपील केले होते. या प्रकरणाची सुनावणी पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे.

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे व नवीन शहरटाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयात राहत असलेले वर्षनिहाय ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेली घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी तक्रार अंत्रे येथील ज्ञानदेव सोलट यांनी गटशिक्षणाधिकाऱयांकडे केली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी चौकशी करून शहरटाकळी आणि ढोरसडे येथील पाच जिल्हा परिषद शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात त्या पाचही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांकडे अपील केले होते. त्या अपिलाची सुनावणी पूर्ण होऊन शिक्षकांनी मुख्यालयी राहत असलेल्या वर्षनिहाय ठराव सादर केलेले दिसून न आल्यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांचा आदेश कायम ठेवून वसुलीचे आदेश दिले आहेत.

शासननिर्णयानुसार 19 सप्टेंबर 2019च्या आदेशाने शासकीय कर्मचाऱयांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यालयात वास्तव्य करीत असताना ग्रामसभेचा ठराव सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, ढोरसडे, शहरटाकळी येथील शिक्षक मुख्यालयात न राहता घरभाडे व भत्ता घेत होते. वर्षापासून सुरू असलेल्या लढाईला यश आले.

– ज्ञानेश्वर सोलाट, सामाजिक कार्यकर्ता अत्रे, शहरटाकळी