प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षङ्यंत्र रचले गेले आहे. असे महापाप करणाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीने करण्यात आली. यासाठी बिनखांबी गणेश मंदिर येथे आज आंदोलन करण्यात आले.

जगभरातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही केवळ भेसळ नसून, हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे.

माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असताना तिरुपती बालाजी मंदिरात लाडू बनवण्याचे कंत्राट एका समाजाच्या संस्थेला देण्यात आले होते. तसेच मंदिराच्या विश्वस्तपदी अन्य धर्मीयांच्या व्यक्तींना नेमले गेले होते. मंदिर परिसरात मिशनऱयांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले. अशी अनेक पापे त्या काळात करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी रामभाऊ मेथे, संतोष लाड, किशोर घाटगे, किरण दुसे, अभिजीत पाटील, राजू यादव, गजानन तोडकर, शरद माळी, आनंद पवळ, किरण कुलकर्णी उपस्थित होते.