सहावीच्या विद्यार्थ्यावर दंगल आणि हत्येचा गुन्हा दाखल, UP पोलिसांचा अजब कारभार

पाण्याचा नळ बसवण्यावरुन वाद झाल्यानंतर पोलिसांनी सहावीत शिकणाऱ्या 10 वर्षांच्या मुलावर दंगल घडविण्याचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. कोणताही तपास न करता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यात घडली आहे. 17 सप्टेंबर रोजी पाण्याचा नळ बसवण्यावरुन दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठत एकमेकांविरोधत तक्रार दाखल करण्यासाठी पत्र दिले होते. मात्र पोलिसांनी एकाच गटाच्या तक्ररीवरुन दुसऱ्या गटातील प्रदीप आणि इतर 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र या FIR मध्ये प्रदीपचा सहावीत शिकणारा 10 वर्षांच्या मुलाचा सुद्धा समावेश करण्याता आला. त्यामुळे कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 191 (दंगल) आणि 109 (खूनी हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलाच्या कुटुंबीयांना यामुळे धक्का बसला असून त्यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेत गुन्हा मागे घेण्यास सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपुऱ्या माहितीमुळे आणि वयाचा उल्लेख केला नसल्यामुळे मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याचे नाव FIR लीस्टमधून काढण्यात येईल, तशा सुचना संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजकुमार सिंह यांनी सांगितले.