Ravichandran Ashwin ने मोडला 62 वर्षांपूर्वीचा विक्रम; दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे, वाचा सविस्तर…

चेन्नई कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. रविचंद्रन अश्विनने अष्टपैलु कामगिरी करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. या धमाकेदार कामगिरी सोबत 38 वर्षांच्या अश्विनने 62 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

टीम इंडिया अडचणीत असताना पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने 133 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच दुसऱ्या डावात त्याने बांगलादेशी फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 88 धावा देत 6 विकेट घेतल्या. यामुळे रविचंद्रन अश्विन एका कसोटी सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने हिंदुस्थानच्या पॉली उमरीगर यांचा 62 वर्षांपूर्वीच विक्रम मोडला आहे. पॉली उमरीगर यांनी 1962 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 172 धावा आणि 5 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर टीम इंडियाकडून कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. 1955 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना विनू मांकड (37 वर्ष) यांनी पाच विकेट घेतल्या होत्या. त्यांचा विक्रम आता अश्विनने मोडला आहे.

रविचंद्रन अश्विनने चेन्नई येथे खेळताना दुसऱ्यांदा शतक झळकावत पाच विकेट घेतल्या आहेत. त्यामुळेच एकाच मैदानावर दोन वेळा शतक ठोकत पाच विकेट घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने यापूर्वी 2021 साली इंग्लंडविरुद्ध 106 धावा आणि 43 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. तसेच अश्विनने कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात सातव्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. याबाबतील त्याने शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांची बरोबरी केली आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा रंगना हेराथ असून त्याने चौथ्या डावात तब्बल 12 वेळा पाचहून अधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

अश्विनने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 37 व्यांदा एकाच डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने या बाबतीत शेन वॉर्नची बरोबरी केली आहे. या क्रमवारीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर असून त्याने 67 वेळा एकाच डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावार आता कसोटी क्रिकेटमध्ये 522 विकेट्स आहेत.