माझे काही बरेवाईट झाले तर भाजपला नेस्तनाबूत करा ! मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

उपोषणाचा पाचवा दिवस आहे. माझी प्रकृती खालावली आहे. काही बरेवाईट झाले तर राज्यात भाजपला नेस्तनाबूत करा, देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकारणात दिसता कामा नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मध्यरात्री फोन करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी द्या आणि उपचार घ्या अशी विनंती केली. मंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी उपचार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे यांच्या देखरेखीखाली जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास उपचार घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

दंगली झाल्यास फडणवीस, भुजबळ जबाबदार
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनीच खोडा घातला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही यावेळी मनोज जरांगे यांनी केला. ओबीसी समाजाने आंतरवालीतच उपोषण करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी केला. आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. धनगर आणि धनगड एकच आहेत तर मराठा आणि कुणबी वेगवेगळे कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आंतरवालीत शांततेत या
वडीगोद्रीत ओबीसी नेत्यांच्या उपोषणासमोर रात्री गोंधळ झाला. दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला, घोषणाबाजी झाली. मराठा समाजाने वडीगोद्रीतून येताना शांततेत यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. आंतरवालीकडे येणारा रस्ता पोलिसांनी अडवू नये, नसता मला स्वतःला बॅरिकेड्स काढण्यासाठी यावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.