रखवालदारानेच 52 लाखांच्या भाताचा फडशा पाडला; धसई केंद्रातून दोन हजार क्विंटल धान्य लंपास

शहापूरचा 15 कोटींचा भात घोटाळा उघडकीस आला असतानाच आता धसईतही तब्बल 52 लाखांच्या धान्यावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेसाठी ठेवलेल्या रखवालदारानेच दोन हजार क्विंटल धान्य लंपास केले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 20 दिवसांपूर्वी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप या आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल धसईवासीय विचारत आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील हमीभाव धान्य घोटाळ्याची मालिका कायम सुरू आहे. मुरबाड येथील न्याहाडी, चरीव केंद्रांतर्गत येत असलेल्या धसई केंद्रात हजारो क्विंटल भात गायब झाल्याने खळबळ उडाली होती. हा घोटाळा मार्च महिन्यापासून सुरू असून हजारो क्विंटल भाताची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर महामंडळातील अधिकाऱ्यांची अक्षरशः पळापळ झाली.

आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हजारो क्विंटल भात गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, गोडाऊनमधील आवक-जावक अधिकाऱ्यांनी तपासली असता 52 लाखांचा दोन हजार क्विंटल भात गायब असल्याचे आढळून आले. हा संपूर्ण प्रकार गोडाऊनचा रखवालदार अच्युत वाळकोळी यांनी केला असल्याचे उघडकीस आल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर सोनवणे यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन 20 दिवस उलटले तरी मोकाट रखवालदार पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याची खंत संचालक अनिल भांगले यांनी व्यक्त केली.