धारावीत तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड

धारावीमधील मशिदीचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर जमावाने  हल्ला केल्याचा प्रकार आज घडला. यावेळी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक होत कारवाई सुरू केली असता मुस्लिम बांधवांनी मशिदीला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेत पालिकेच्या गाडीचीही तोडफोड केली. यावेळी पोलीस-पालिका कर्मचारी आणि जमावामध्ये  धुमश्चक्री उडाल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर मशिदीचे बांधकाम स्वतःहून हटवण्याची हमी मशिदीच्या ट्रस्टींकडून देण्यात आल्यामुळे पालिका कर्मचारी माघारी फिरल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

धारावीमध्ये 90 फूट रोडवर सुभानिया नावाची एक मशीद आहे. ही मशीद 25 वर्षांपासून या ठिकाणी असल्याचा दावा मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे. मात्र या मशिदीत बेकायदा बांधकाम झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्याने पालिकेने मशिदीमधील बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पालिका कर्मचारी पोलीस फौजफाटय़ासह आज सकाळी दाखल झाले. मात्र मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही अशी  भूमिका घेत मुस्लिम बांधव आक्रमक झाले. मात्र पालिकेने विरोध डावलून कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यामुळे जमाव आणि पोलीस-पालिका कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. कारवाईविरोधात जमावाने पालिकेच्या गाडीवर दगडफेक करीत रस्त्यावरच ठिय्या मांडला. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.   दरम्यान, धारावीतील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना खासदार वर्षा गायकवाड, शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी नागरिकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन करीत पोलिसांसोबत संवादही साधला.

शुक्रवारी रात्रीपासूनच विरोधाची रणनिती

z मुंबई महापालिकेचे कर्मचारी मशिदीवर कारवाई करणार असल्याची कुणकुण लागताच शुक्रवारी रात्रीपासून कारवाईला विरोध करण्यासाठी रणनिती आखण्यात आली होती. जमावाने रात्रीपासूनच मशिदीजवळ ठिय्या मांडला. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कारवाईची माहिती देण्यात आली. यामुळेच सकाळी पालिका कर्मचारी पोलिसांसह कारवाई करण्यासाठी गेले असता पाच हजारांवर जमाव या ठिकाणी उपस्थित होता, असे बोलले जात आहे.

सहा दिवसांत अतिक्रमण स्वतःहून हटवणार

z धारावीतील प्रचंड तणाव निर्माण झाल्यामुळे अखेर कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली. सहा दिवसांसाठी कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या कालावधीत स्वतःहून अतिक्रमण हटवणार असल्याची हमी मशिदीच्या ट्रस्टींनी पालिकेला दिल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

वर्षा गायकवाड यांनी  मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र

z या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी सुभानिया मशिदीचा अवैध भाग पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या पत्राला उत्तर मिळण्यापूर्वीच बीएमसीने ही कारवाई केली. यामुळेही संताप व्यक्त केला जात आहे.

कष्टकऱ्यांची धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी मिंधे सरकार हिंदूमुस्लिमांची एकजूट तोडून फूट पाडत आहे. हिंदूमुस्लिम समाजात दंगल घडवण्याचा हा डाव सुरू आहे. लाडक्या कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबई लुटण्याचा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख