‘D’CM….डरपोक सीएम मिंधे; आदित्य ठाकरे यांचा सिनेट निवडणुकीवरून घणाघात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ऐनवेळी स्थगित केल्यामुळे युवासेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारवर घणाघात केला. आज स्पष्ट झाले की एवढे भित्रे, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही. डरपोक सीएम मिंधे… या सीएमनेही ‘डी’सीएम लावायला पाहिजे, असा हल्लाही आदित्य ठाकरे यांनी चढवला.

सिनेटची निवडणूक गतवर्षी ऑगस्ट महिन्यात व्हायला हवी होती. मात्र ही निवडणूक तीन वेळा रद्द करण्यात आली. यावेळी 22 सप्टेंबरला होईल असे न्यायालयाच्या निर्णयात ठरले होते. पण शुक्रवारी रात्री मुंबई विद्यापीठाने पत्रक काढत ही निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे सांगितले. 2015 ची निवडणूकही 2018 मध्ये झाली होती. तेव्हा युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मिंधे-भाजप सरकारचा हस्तक्षेप वाढत असून आजूबाजूच्या दोन-तीन हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. शिवसेनेचा, युवासेनेचा विजय होईल अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. विधानसभेआधी कुठलीही निवडणूक होऊ द्यायची नाही, असे त्यांच्या मनात आहे. त्यामुळे सीएमच्या पुढे डी लावावा लागेल. डरपोक सीएम मिंधे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीवेळी पुणे आणि चंद्रपूरमधील पोटनिवडणूक होऊ दिली नाही. गेल्या दोन-अडीच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही. मुंबई विद्यापीठातही हरतील ही भीती त्यांच्या मनात बसलेली आहे, त्यामुळे ही निवडणूकही घेत नाहीत. आमचे 10 उमेदवार सरकार पाडू शकत नाही. नगरसेवक, आमदाराचे काम करू शकत नाहीत. मुंबई विद्यापीठाची सिनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे विषय मांडून त्यांना न्याय मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. पण ही निवडणूकही होऊ दिली जात नाही. न्यायालयाच्या निर्णयाचाच हा अवमान असून न्यायालयाने कुलगुरुंवर कारवाई केली पाहिजे. आमचे सरकार आल्यावर कुलगुरुंवर सखोल चौकशी लावून पुढची कारवाई करू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

वन नेशन, वन इलेक्शन म्हणणारे दोन राज्यात निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. एका विद्यापीठाची निवडणूकही हे घेऊ शकत नाहीत, ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल करत याच लोकशाही आणि संविधानासाठी आमची लढाई असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठ, मिंधे-भाजप तरुणांच्या, सुशिक्षित मतदारांना घाबरते. एका बाजूला शेतकरी हैराण आहेत, दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढताहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेत नाहीत. यामुळे लोकांना सरकार बदलायचे असून विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने आणावे लागेल, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.