चंद्रपुरात 7 वर्षाच्या भावेशला बिबट्यानं उचलून नेलं; वन विभागाला जंगलात मुंडकं सापडलं

चंद्रपूरमध्ये घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेले. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून शनिवारी सकाळी मुलाचे मुंडके वनविभागाला जंगलामध्ये सापडले. भावेश झारकर (वय – 7) असे मुलाचे नाव आहे. तो चंद्रपूर जवळच्या सिनाळा येथील रहिवासी होती. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 7 वर्षाचा भावेश घराजवळ खेळत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उचलून जंगलाकडे धाव घेतली. बराच वेळ झाल्यानंतरही भावेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. संशय आल्याने याची माहिती वन विभागाला आणि दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली.

वन विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी भावेशचा शोध सुरू केला. शनिवारी सकाळच्या सुमारास जंगलामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये भावेशचे मुंडके आणि इतर अवयव सापडले. ही माहिती कळताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. सध्या भावेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.