स्वयंपाकघर- प्रवास अंबिका चना भंडारचा

>> तुषार प्रीती देशमुख

पाणीपुरी, शेवपुरी, चाटचे विविध प्रकार आणि सोबत गरमागरम चणे, शेंगदाणे, कुरमुरे आठवताच आपल्यासमोर येते ते चना भांडार वा चाटचा ठेला. दादरमधील शिवाजी मंदिरजवळील ‘अंबिका चना भंडार’ या दुकानाचे हेच खास वैशिष्टय़ आहे.

श्रावणातील शुक्रवारी देवीला चणेगुळाचा नैवेद्य दाखवण्यासाठी आई चणे आणायला सांगायची तेव्हा चना भंडारमधील गरमागरम चणे आणून देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच ते खाण्याची मजाच काही वेगळी असायची… नाही का?

गरमागरम चणे, शेंगदाणे, कुरमुरे आठवताच दादर पश्चिम, शिवाजी मंदिरजवळ स्टार मॉल येथील 92 वर्षीय ‘अंबिका चना भंडार’ या दुकानाचा प्रवास डोळ्यासमोर आला.

वाराणसीमधील जोनपुर गावातील नारायण गुप्ता मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले व चणे, शेंगदाणे विकू लागले. 1932 साली दादरमधील केळकरवाडीमध्ये एक छोटेसे दुकान घेऊन त्यांनी चणे, शेंगदाणे, कुरमुरे करण्याची भट्टी सुरू करून व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

नारायणजी सकाळी पाच वाजता भट्टी सुरू करायचे ती दुपारी बारा वाजेपर्यंत चालायची. भट्टीमध्ये चणे, शेंगदाणे, चणाडाळ व कुरमुरे हे पदार्थ व्हायचे. ते बनवण्यासाठी तासातासाने कामगार बदलायचे. असे एकूण 15 कामगार त्यांच्याकडे भट्टीमध्ये काम करायचे. चणे, शेंगदाणे, कुरमुरे बनवणारे हेच कामगार निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये हे सर्व घेऊन विक्रीसाठी फुटपाथवर, छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तसेच समुद्रकिनारी फिरायचे. हातावर आपले पोट असलेले अनेक जण हेच एक-दोन रुपयांना मिळणारे कुरमुरे खाऊन दिवसभराचं पोट भरायचे.

नारायण गुप्तांनी स्वतचा व्यवसाय वाढवलाच, पण त्याचबरोबर आपल्या कामगारांनादेखील स्वावलंबी बनवले. त्यांच्या या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी त्यांचा मुलगा प्यारेमोहन गुप्ता यांनी त्यांना मोलाची साथ देऊन आपला व्यवसाय पुढे नेला. व्यवसायात अनेक अडीअडचणी आल्या, पण त्यावर मात करत न डगमगता त्यांनी आपला व्यवसाय टिकवून ठेवला तो त्यांच्या पत्नी बसंती गुप्ता यांच्यामुळे. त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांची व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे प्यारे मोहन यांनी दुकानाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या पेलवली. देवकार्याला, सणावारासाठी लागणाऱया भाताच्या लाह्या, बत्तासे, साखरेची माळ अशा सगळ्या वस्तू फक्त भट्टी असलेल्या चना भंडारमध्येच मिळायच्या.

प्यारे मोहनजी आपल्या कुटुंबासोबत दुकानाच्या पाठच्या बाजूला राहायचे. त्यामुळे त्यांची मुलंदेखील लहानपणापासून दुकानात त्यांना मदत करायची. त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुलं पंकज व नीरज गुप्ता यांनी आपल्या वडिलांना व्यवसायात साथ द्यायची ठरवले. दुकानाच्या जागेचा पुनर्विकास झाला. जुन्या केळकरवाडी बैठी वसाहतीगृहाचे रूपांतर भल्यामोठय़ा ‘स्टार मॉल’ या नावाच्या मॉलमध्ये झाले. तिथे त्यांना आतल्या बाजूला जागा मिळाली तेव्हा त्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिलेत. आपला व्यवसाय खरंच पुढे चालेल का? गिऱहाईक येतील का?

पंकज व नीरज गुप्ता यांनी आपल्या वडिलांकडून चाट बनवण्याच्या सर्व पदार्थांचे योग्य प्रशिक्षण घेऊन त्यात ते तरबेज झाले. ‘अंबिका चना भंडार’ या दुकानामध्ये अनेक फरसाणाचे प्रकार व चाट मिळू लागले. मॉलमध्ये खरेदी करायला येणारे लोक हळूहळू दुकानाकडे चाट खायला बोलू लागले. ग्राहकांच्या पसंतीला येणारी दुकानातील शिवपुरी व पाणीपुरी म्हणजे एक नंबर. हळूहळू ग्राहक वाढू लागले आणि चाट खायला ग्राहकांची दुकानासमोर रांग लागू लागली. चाटला लागणाऱया सगळ्या चटण्या व मसाले ते स्वत त्यांच्या सिक्रेट रेसिपीप्रमाणे बनवतात. ज्यामुळे त्या पदार्थांची चव एकदम भारी असते. चाटचा कोणताही प्रकार खाऊन झाला की, एक शेवटी सुका पुरी दिली जायची, जी प्रत्येकाला खूप आवडू लागली. त्यामुळे चाटच्या पदार्थांमध्ये सुका पुरी ही एक वेगळी डिश तयार झाली. त्यांच्या दुकानातील झणझणीत ‘उपरवाला’ हा पदार्थ म्हणजे एकदमच भारी.

चाट हे फक्त दोन अंकी नाव असलं तरी त्यातील कोणताही एक पदार्थ करण्यासाठी जी काही मेहनत लागते ती प्रचंड असते. कारण त्यातील सर्व घटक हे कापून चिरून ठेवावे लागतात. त्यासाठी लागणारी गोड चटणी, तिखट चटणी, सुकी चटणी या सर्व चटण्या आधी बनवल्या जातात. आपण का एकदा त्या पदार्थाची ऑर्डर केली की, आपल्याला तो पदार्थ कधी एकदा खातोय असं वाटतं. तो तयार होण्यासाठी जो काही वेळ लागतो तोपर्यंत आपल्याला संयम राहत नाही आणि मग अनेकदा किती वेळ झाला अजून… का मिळत नाही? असं आपण बोलत असतो. परंतु पदार्थ तयार करत असताना योग्य प्रमाण वापरून तो पदार्थ आपल्याला खायला दिल्यानंतरच त्याची चवही रुचकर लागते.

आपल्याला प्रत्येकाला आवडणारे, आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे सर्व चाटचे प्रकार ओली भेळ, सुकी भेळ, शेवपुरी, रगडा पॅटीस, दहीपुरी, पाणीपुरी, पापडी चाट, रगडापुरी, उपरवाला, सुकी पुरी यातील कोणताही पदार्थ खाल्ला की, ‘वाह… क्या बात है!’ असंच म्हटलं जातं. कारण तितक्याच प्रेमाने ते स्वतच्या हाताने बनवून आपल्याला खाऊ घालत असतात. पंकज गुप्ता यांचा मुलगा रोहन हादेखील नोकरी सांभाळून जमेल तेव्हा या व्यवसायाला मदत करत असतो.

अनेक ठिकाणी अजूनही भट्टी असलेले चना भंडार आहेत. चाटची दुकानं, चाटच्या गाडय़ा आहेत, ज्यांनी मेहनत करून वर्षानुवर्षे हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे, अशा प्यारे मोहन गुप्ता व त्यांच्यासारखी मेहनत करणाऱया अनेक उद्योजकांना, ज्यांच्यामुळे आपल्याला मेहनत न करता, सर्व खटाटोप न करता चमचमीत खायला मिळते अशा सर्वांना पुढील यशस्वी प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!

[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)