बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा मुंबईत भीषण अपघात, गंभीर दुखापत; ICU मध्ये उपचार सुरू

‘खोसला का घोसला’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेते प्रवीण डबास यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुखापत गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी प्रवीण डबास यांच्या कारचा अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबईतील वांद्रे भागातील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिती झंगियानी रुग्णालयात पोहोचली आहे.

प्रवीण डबास हे आर्म रेसलिंग ‘प्रो पंजा लीग’चे को फाऊंडरही आहेत. त्यांच्या अपघातानंतर ‘प्रो पंजा लीग’ने निवेदन जारी करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ‘प्रो पंजा लीग’चे सह-संस्थापक प्रवीण डबास यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी दुर्दैवाने त्यांचा कार अपघात झाला. त्यांच्यावर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या कठीण प्रसंगी आमच्या संवेदना प्रवीण आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ते लवकरच बरे होईल अशी कामना करतो, असे यात नमूद केले आहे.

दरम्यान, प्रवीण डबास यांनी ‘रागिणी एमएमएस-2’, ‘माय नेम इज खान’, ‘खोसला का घोसला’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासह ‘मेड इन हेव्हन’ यासारख्या प्रसिद्ध सीरिजमध्येही ते झळकले. अमेझॉन प्राईमवर नुकत्याच रीलिज झालेल्या ‘शर्मा जी की बेटी’ चित्रपटातही ते दिसले.

प्रिती झंगियानीसोबत विवाह

50 वर्षीय प्रवीण डबास यांनी 2008 मध्ये प्रिती झंगियानीसोबत विवाह केला. त्यांना दोन मुला आहेत. दोघांची भेट विद लव्ह…. तुम्हारा या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रिकरणादरम्यान दोघं प्रेमात पडले आणि नंतर लग्नही केले. त्यानंतर त्यांनी Swen Entertainment नावाची कंपनीही सुरू केली.