Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेविरोधात 500 पानांची चार्जशीट

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा तपास करून एसआयटीने आज कल्याणच्या विशेष पोक्सो न्यायालयात आरोपी नराधम अक्षय शिंदे याच्याविरोधात 500 पानांचे चार्जशीट दाखल केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावे, अशी विनंती बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग यांनी न्यायाधीशांकडे केली आहे.

सफाई कामगार नराधम अक्षय शिंदे याने त्याच शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेला वाचा फुटताच बदलापुरात संतापाचा भडका उडाला. बदलापूरकरांनी आठ तास रेल रोको केला. या घटनेचे संतप्त पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर पोलिसांनी नराधम अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला. तसेच हे प्रकरण दडपणारे शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेला एक महिना उलटून गेला तरी फरार झालेले कोतवाल आणि आपटे यांना बदलापूर पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही.

सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची स्थापना केली. या एसआयटीने संपूर्ण एक महिना तपास करून पुरावे गोळा केले आणि कल्याणच्या विशेष पोक्सो न्यायालयात 500 पानी चार्जशीट दाखल केली आहे.

वामन म्हात्रेविरोधात पोक्सो दाखल करण्याची मागणी; प्रकरण एसआयटीकडे वर्ग

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित चिमुकलींची ओळख पटेल असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये, असे न्यायालयाचे सक्त आदेश आहेत. मात्र बदलापुरातील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचा एफआयआर मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे व त्याचा साथीदार महेंद्र शेळके याने व्हॉट्स अॅप व समाजमाध्यमांवरून व्हायरल केला. त्यामुळे पीडित चिमुकलींची ओळख जाहीर झाली. त्याचा भयंकर मनस्ताप पीडित मुलीच्या कुटुंबीयांना झाला. त्यामुळे संतापलेल्या मुलीच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वामन म्हात्रे व महेंद्र शेळके यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत त्यांनी व्हायरल केलेल्या एफआयआरचे पुरावेच पोलिसांना दिले. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन याचा तपास एसआयटीकडे वर्ग केला आहे.