राष्ट्रपतींनी केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला; आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती, 5 मंत्र्यांसह घेणार शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला असून आतिशी मार्लेना यांची अधिकृतपणे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्या शनिवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राज निवास येथे हा शपथविधी सोहळा होईल.

आतिशी यांच्यासोबतच 5 मंत्र्यांच्या नियुक्तीलाही राष्ट्रपतींनी मान्यता दिली असून राष्ट्रपती कार्यालयाने याबाबतची अधिसूनचनाही जारी केली आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला होता. त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठीची फाईल मंजुरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पावण्यात आली. त्यात शपथविधी सोहळ्यासाठी 21 सप्टेंबर ही तारीख निवडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. आता राष्ट्रपतींनीही यावर मोहोर उमटवत केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला असून आतिशी यांची अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे.

तत्पूर्वी केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आतिशी यांची निवड करण्यात आली. पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी मुख्यमंत्रीपदी राहतील असा निर्णय आपने एकमताने घेतला होता. आता राष्ट्रपतींनीही यास मंजुरी दिली असून शनिवारी सायंकाळी आतिशी आणि पाच मंत्री शपथ घेतील. यात गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे.

कोण आहे आतिशी?

आतिशी मार्लेना यांचा जन्म पंजाबी राजपूत कुटुंबात झाला असून त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. 2020 मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. त्यानंतर 2023 मध्ये केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. आता वर्षभरातच त्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान आतिशी यांना मिळाला आहे.