तोतया ईडी अधिकाऱ्याने मारला वृद्ध महिलेच्या बँक खात्यावर डल्ला

तोतया ईडी अधिकाऱ्याने अटकेची भीती दाखवून ठगाने वृद्ध महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या खार परिसरात राहतात. गुरुवारी सकाळी महिलेला एका नंबरवरून पह्न आला. त्याने तो कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे भासवले. तिचे एक पार्सल परत आले असून त्यात ड्रग सापडले आहे. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करावी लागणार असल्याचे सांगून त्याने पह्न बंद केला. काही वेळाने एका नंबरवरून महिलेला पुन्हा पह्न आला. त्याने तो ईडीचा अधिकारी असल्याचे सांगितले. ड्रगप्रकरणी अटक वॉरंट निघाले आहे. तिच्या कागदपत्रावरून काही बँकेत खाती उघडण्यात आली आहे. त्यात फसवणुकीचे कोटय़वधी रुपये जमा झाले आहे. मनी लॉण्डरिंग झाल्याने अटक करावी लागेल. अटक केल्यास जेलमध्ये जावे लागेल अशी भीती दाखवली.

ड्रग प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे. या पूर्ण प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत कोणालाही काही सांगू नये असे महिलेला सांगितले. कारवाईच्या नावाखाली महिलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. भीतीपोटी महिलेने ते ओटीपी शेअर केले. ओटीपी शेअर करताच  तिच्या खात्यातून पैसे गेले. खात्यातून पैसे गेल्यावर फसवणूक झाल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आला. तिने बँकेत पह्न करून खाते ब्लॉक करण्यास सांगितले. घडल्या प्रकरणी महिलेने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.