Nagar News – जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महिला कामगार, 23 सप्टेंबरला आक्रोश मोर्चा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि.23 सप्टेंबर) ढोल व थाळी बजाव आंदोलन करुन महिला कामगारांचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे.

बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात महिला कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी केले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने महिला कामगारांना पाच हजार रुपये महिना कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच नोंदीत कामगारांना दिवाळीसाठी 5 हजार रुपये बोनस म्हणून दिले जायचे. परंतु तीन ते चार वर्षांपासून हा बोनस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी 10 हजार रुपये बोनस देण्यात यावा, कामगार कल्याणकारी मंडळकडून तालुकास्तरावर उभारण्यात आलेल्या बीओसी सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्त करावा. त्याचबरोबर बीओसी सेंटरवर ई निविदा न काढता कर्मचारी भरती केलेली आहे. परंतु, त्या भरतीमध्ये एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांकांचा विचार करुन त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा आक्रोश मोर्चा ढोल व थाळी वाजवून धडकणार आहे. या आंदोलनासाठी शंकर भैलुमे, महतिकुमार दोशी, निसार शेख, वैभव सोनवणे, आदेश साळवे, संगीता बोखारे, लक्ष्मी लवटे, दिपाली सरोदे, आसमा शेख, आशा माने, राणी घोडके, मंगल पाखरे, कांतीलाल भिसे, राहुल अडसूळ, रियाजभाई तांबोळी, समीना सय्यद, सुनील जाधव, सुनिता सरोदे, स्वप्निल जाधव, विशाल खराडे, शाहिन शेख, पुनम समुद्र, राहुल अडसूळ, शोभा येडे, मालन पवार, अश्‍विनी वांकडे, साधना साळवे, राणी जाधव आदी प्रयत्नशील आहेत.