Ind Vs Ban 1st Test – अश्विनचे शतक अन् बुमराहचा चौकार, दुसऱ्या दिवशी बांगलादेशी ‘वाघ’ ढेपाळले

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. दुसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा करत 308 धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या सामन्यात जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा सहावा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.

रविचंद्रन आश्विन (113 धावा) आणि रविंद्र जडेजा (86 धावा) यांनी केलेल्या महत्वपूर्ण 196 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला आपल्या पहिल्या डावात 376 धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरात बांगलादेशला आपल्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या गोलादजांनी चांगलेच झखडून ठवले. यामुळे त्यांना फक्त 149 धावा करण्यात यश आले. शकिब उल हसन (32 धावा) व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच आकाश दीप, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 या धावसंख्येवर बाद झाला.

टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून टीम इंडियाला तीन महत्वपूर्ण हादरे बसले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (5 धावा) स्वस्तात माघारी परतला. यानंतर यशस्वी जैसवाल (10 धावा) आणि विराट कोहली (37 धावा) हे बाद झाले. त्यानंतर शुभमन गिल (33 धावा) आणि ऋषभ पंत (12 धावा) दोघांनीही डाव सावरला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियाने 3 विकेट गमावत 81 धावा केल्या आहेत.