“कुणाला एवढीच खुमखुमी असेल तर…”, छोटा भाऊ-मोठा भाऊवरून संजय राऊत यांचे रोखठोक मत

महाविकास आघाडीमधअये लहान भाऊ, मोठा भाऊ वगैरे… वगैरे… काही नसल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलेले आहे. आम्ही तिनही पक्ष एकत्र निवडणूक लढवू. कुणाला एवढीच खुमखुमी असेल तर लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ… तर महाराष्ट्रातील चित्र भविष्यात कळेल, असे रोखठोक मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची या संदर्भातील भूमिका स्पष्ट आहे. लोकसभेला काँग्रेसला तीन-चार जागा जास्त मिळाल्या आहेत. त्यामुळे कुणाला वाटेत असेल की आम्ही मोठा भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत तर त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचेही योगदान आहे. याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने कोल्हापूर आणि रामटेकची जिंकलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो देखील काँग्रेसला दिला. या तिनही जागा शिवसेनेमुळे वाढल्या आहेत हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पण तो लोकसभेचा आत्मविश्वास होता, विधानसभेसाठी आपल्याला काम करावे लागेल आणि त्यासाठी तिनही पक्षांना एकत्र रहावे लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून ते एकटे लढणार नाहीत ना? तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय, महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? असा सवालही राऊत यांनी केला.

लोकसभेला तिनही पक्ष ज्या मजबुतीने लढले त्याच पद्धतीने विधानसभा लढू, असेही राऊत म्हणाले. लोकसभेला 48 जागांचीच चर्चा करायची होती, त्यामुळे जागावाटप अधिक सोपे होते. मात्र विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. तिनही प्रमुख पक्ष असून आमचे काही मित्रपक्षही आहेत. त्यांनाही सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठीच बनवली जाते; ‘मविआ’च्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न! – संजय राऊत

मुंबईतील जागांवर महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चाही राऊत यांनी फेटाळल्या. माध्यमांत ज्या बातम्या चालवल्या जात आहेत तसे नसून आम्ही सर्वच जागांवर चर्चा करत आहोत. ज्या पक्षाची जिंकून येण्याची क्षमता आहे त्याला ती जागा दिली जाईल. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही जागांवरून मतभेद नाहीत. काही जागांवर झालेच तर आम्ही चर्चा करू, असे म्हणत राऊत यांनी आज जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक असल्याचीही माहिती दिली.