भिवंडीचे डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची उचलबांगडी

भिवंडीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर मंगळवारी मध्यरात्री दगडफेकीची घटना घडली. यानंतर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळत विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली. डीसीपी श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आपला जीव धोक्यात घालून धार्मिक दंगल घडवण्याचा समाजकंटकांचा डाव हाणून पाडला. मात्र राज्य सरकारने पोलिसांचे कौतुक करण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. सरकारने डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करून दंगल रोखल्याचे ‘बक्षीस’ दिले आहे. याबाबद्दल पोलीस दलात नाराजीचा सूर आहे.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वंजारपट्टी नाका या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक आली असता अचानक अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गणेशभक्त, हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. दोन्ही समाज समोरासमोर आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला. दोन्ही गटाच्या जमावाला पांगवले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांनी केले. दंगलसदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

एका बड्या नेत्याला दंगल पेटवायची होती

दंगल थांबविण्याचे काम भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत
परोपकारी यांनी केले म्हणून त्यांची बदली करण्यात आली. भिवंडीतील भाजपच्या एका बड्या नेत्याला दंगल पेटवायची होती, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती टळली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पोलिसांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करीत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

शहरातील तंग वातावरण पाहता बुधवारी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे संपूर्ण दिवस भिवंडीत ठाण मांडून होते. त्यांनी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच इतर घटकांकडून संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेत शासनाला अहवाल पाठविला होता. मात्र समाजकंटकावर कारवाई करण्याऐवजी शासनाने डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी मुंबईतील पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांची नियुक्ती केली आहे.