गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची गाढ निद्रा; महिना उलटला, आपटे आणि कोतवाल काही सापडेनात!

बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. ठिकठिकाणी आंदोलने झाली. लाखो जागरूक नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर नराधम आरोपी अक्षय शिंदे याला बेड्या घालण्यात आल्या. पण सदर घटनेस एक महिना आठ दिवस उलटून गेले तरी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे अजूनही पोलिसांना सापडेनात.

ते दोघे कुठे राहतात, काय करतात याची पोलिसांना इत्यंभूत माहिती आहे. मग त्यांना कोण वाचवत आहे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाढ निद्रा लागली आहे काय, असा संतप्त सवाल बदलापूरमधील जागरूक नागरिक करीत आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळेमध्ये 12 ऑगस्ट रोजी दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना घडली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलनही करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. मुख्य आरोपीला अटक केली असली तरी अत्याचारादरम्यानचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. यामुळे या घटनेला जबाबदार धरून न्यायालयाच्या आदेशानंतर संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना सहआरोपी केले आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून ते अद्यापही फरार आहेत. कोतवाल यांचे घर कुळगावच्या दत्त प्रसाद या इमारतीमध्ये असून तुषार आपटे हे बिल्डर आहेत. श्री अपार्टमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे. दोघांचेही पत्ते पोलिसांना माहिती असूनही अजूनपर्यंत त्यांचा थांगपत्ता कसा लागला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुप्तचर खाते करते काय?

एखाद्या घटनेतील आरोपी शोधण्याची इच्छा असेल तर पोलीस कोणत्याही टोकाला जातात, कुठूनही आरोपीला शोधून काढतात. बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास एसआयटीकडे देऊनही संस्थाचालक आपटे व कोतवाल सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुप्तचर खाते करते तरी काय याचीही चर्चा सध्या बदलापूरकर करीत आहेत. गाढ निद्रेत असलेले गृहमंत्री फडणवीस यांनी जागे व्हावे व तातडीने आपटे व कोतवाल यांना पकडावे अन्यथा पुन्हा जनक्षोभ उसळेल, असा इशारा जागरूक नागरिकांनी दिला आहे.