हरयाणात पुतण्याचे बंड; भाजपला धक्का… माजी मुख्यमंत्री खट्टर यांचा पुतण्या काँग्रेसमध्ये

हरयाणा विधानसभेच्या ऐन रणधुमाळीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. हरयाणातील भाजप नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे रमीत खट्टर यांनी बंडाचा झेंडा फडकावत आज भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रमीत खट्टर हे मनोहरलाल खट्टर यांचे भाऊ जगदीश यांचे चिरंजीव आहेत.

रमीत खट्टर यांनी रोहतकचे आमदार भारतभूषण बत्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने त्यांचे जोरदार स्वागत केले. याबाबत हरियाणा युवक काँग्रेसने एक्सवर छायाचित्रासह पोस्ट केली आहे. रमीत खट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशाने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. अंबाला, कुरुक्षेत्र, यमुना नगर या भागात खट्टर कुटुंबीयांचा प्रभाव आहे. येथे आता काँग्रेसच्या बाजूने पारडे झुकू शकते, असे बोलले जात आहे.

भाजपला आणखी एक झटका

भाजपचे वरिष्ठ नेते आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी सरचिटणीस गुरविंदर सिंग धमिजा यांनीही गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहतक येथे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या उपस्थितीत धमिजा यांनी राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. मी माझे मित्र आणि हितचिंतकांसमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे त्यांनी सांगितले.