सदावर्तेंचे गुण आणि रत्ने उधळली, 35 लाखांच्या अपहाराचा आरोप करीत एसटी कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात दाखवला इंगा

‘एसटी’ कर्मचाऱ्यांचा कैवारी असल्याचा आव आणत ऊठसूट आक्रस्ताळपणे आराडाओरडा करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे गुण आणि रत्ने आज भंडाऱयात उधळून लावण्यात आली. ‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंना इंगा दाखवला. एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत तुफान राडा झाला. सदावर्तेंविरुद्ध कर्मचाऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला. शेकडो सदस्यांनी गुणरत्न सदावर्तेंवर थेट 35 लाखांच्या अपहाराचा आरोप करीत प्रचंड गदारोळ केला. यावेळी उडालेल्या गोंधळात संतप्त सदस्यांनी खुर्च्या फेकत धक्काबुक्कीही केली.

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची 71 वी सर्वसाधारण सभा आज भंडाऱयात आयोजित करण्यात आली होती. मात्र ऍड. गुणरत्न सदावर्तेंच्या कथित घोटाळय़ामुळे या सभेत प्रचंड गोंधळ झाला. एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा अक्षरशः उधळून लावली. वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र यांच्यासह नथुराम गोडसे यांची छायाचित्रे लावल्याचा मुद्दा रेटून धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी अहवालाची पुस्तके अक्षरशः फेकून दिली. दरम्यान, खुर्च्या फेकून मारल्याप्रकरणी विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली.

दम असेल तर समोर या!

सर्वसाधारण सभेत सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ही सभा उधळून लावण्यात आली. सदावर्तेंनी दम असेल तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान विरोधकांनी दिले आहे. हॉटेलमध्ये झोपा काढून बाऊन्सर एसटी बँकेच्या सभासदांवर सोडून भ्याडपणा करू नये, असा इशाराही सदावर्तेंना देण्यात आला आहे.

सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव
एसटी कर्मचारी बँकेच्या सभेतील वाद इतका वाढला की, सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करीत खुर्च्याही भिरकावल्या. खुर्च्यांची तोडफोड केली. बंदोबस्तावरील पोलिसांवरही खुर्च्या फेकण्यात आल्या. त्यानंतर ही सभा अखेर लगतच्या दुसऱया सभागृहात घेण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली.

– जिथे सदावर्ते पती-पत्नी आहेत तिथे राडा होतोच, असा गंभीर आरोप एसटी कामगार कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.
– सदावर्तेंनी एसटीबाहेरचे सभासद नेमण्याचा कुटील डाव आखला असून बँक बुडण्याचा धोका आहे.
– भंडाऱयातील सभा कुठल्याही नियमानुसार पार पडलेली नाही.
– 34 कोटींच्या डेटासेंटरमध्ये अपहार करण्यात आला. ऍड. सदावर्तेंनी बँकेतून 35 लाख रुपये लुटले. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सभेत पारीत करण्यात आला.