मिंधेंचा करंटेपणा, महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 18 हजार कोटींचा सोलार पॅनल प्रकल्प घालवला

मिंधे सरकारच्या करंटेपणामुळे महाराष्ट्रात येणारे अनेक मोठे उद्योग इतर राज्यांमध्ये गेले. लाखो रोजगारांची निर्मिती करणारे बहुतांश उद्योग मिंध्यांनी गुजरातच्या घशात घातले. ते चक्र अजूनही सुरूच असून महाराष्ट्राच्या हक्काचा आणखी एक प्रकल्प आज गुजरातला गेला. नागपूरमध्ये उभारला जाणारा 18 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा आणि रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून देणारा सोलार पॅनल प्रकल्प सरकारने घालवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मिंधे सरकारच्या या नाकर्तेपणाची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 1 लाख 54 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प तसेच टाटा एअरबस विमान प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्क ड्रग पार्क हे लाखो कोटींचे प्रकल्प लाखो रोजगार देणारे होते, परंतु ते एकापाठोपाठ एक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. आता नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला, असे वडेट्टीवार म्हणाले.

हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जिभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा, असे सतत निरर्थक उद्योग करणाऱया महायुती सरकारमुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खूश करण्यात सरकार व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मंत्र्यांची मस्ती आणि आमदारांचे नको ते लाड

राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

फडणवीस नाकाम

रिन्यू कंपनीचा सोलार पॅनल प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात उभारला जाणार होता; परंतु तो गुजरातला जाण्यापासून रोखण्यात फडणवीस नाकाम ठरले असल्याची टीका होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर वडेट्टीवार यांना प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती कुणी दिली, असा उलट सवाल केला आहे.