मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरांमुळे खचला! मोदींच्या लाडक्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अजब दावा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून टीका होत असताना हा महामार्ग बांधणाऱया मोदींच्या लाडक्या कंत्राटदाराच्या कंपनीतील कर्मचाऱयाने उंदरांमुळे हा रस्ता खचल्याचे अजब विधान केले. त्याच्या या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी आता कंपनीने या कर्मचाऱयाची हकालपट्टी केली आहे.

केसीसी बिल्डकॉन या कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱयाने मुंबई-दिल्ली महामार्गाच्या दुरवस्थेला उंदरांना जबाबदार धरले आहे. हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱयाला महामार्गाच्या बांधणीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. त्याने केलेली टिप्पणी अतिशय चुकीची होती. त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हा कर्मचारी देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थापक नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी या महामार्गाच्या दुसऱया टप्प्याचे अनावरण कले होते. या दुसऱया टप्प्यात राजस्थानातील 373 किमी, मध्य प्रदेशातील 244 किमी आणि हरयाणातील 79 किमी टप्प्याचे अनावरण झाले होते. तर सोहना-दौसा हा टप्पा आधीपासूनच कार्यरत होता.

मुंबई-दिल्ली महामार्ग 1386 किमीचा असून हिंदुस्थानातील सर्वात मोठा महामार्ग आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या राज्यातून हा महामार्ग जातो.

काय म्हणाला होता कर्मचारी?

उंदीर किंवा छोटय़ा प्राण्याने खड्डा केला असावा. ज्यामुळे पाणी झिरपून मोठा खड्डा पडला असावा, अशी टिप्पणी या कर्मचाऱयाने केली होती. दरम्यान, या प्रकल्पाचे दौसा येथील संचालक बलवीर यादव यांनी सांगितले की, पाणी झिरपल्यामुळे महामार्गावर खड्डा पडला असावा तसेच रस्ताही खचला असावा.