फाटक्या-डागाळलेल्या साड्या, लेकरही उपाशी… भाजपच्या कार्यक्रमाला आलेल्या लाडक्या बहिणींचा संताप

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सरकारने राज्यात लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनच्या अनुषंगाने नांदेडमध्ये भाजपने साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. मात्र या साड्या फाटलेल्या असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. फाटलेल्या साड्या व अत्यंत ढिसाळ आयोजन असल्याने संतप्त महिलांनी भाजपला फटकारले आहे. तसेच ”प्यायला पाणी देखील ठेवले नाही, आमची लेकरं उपाशी आहेत. त्यात फाटक्या साड्या दिल्या. हाल करायला बोलावले का आम्हाला?”, असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे. TV9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

नांदेडमध्ये भाजपकडून साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साडी वाटप असल्याने या ठिकाणी महिलांची झुंबड उडाली होती मात्र आयोजकांनी अत्यंत वाईट पद्धतीने आयोजन केल्याने महिलांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. प्यायला पाणी नाही, बसायला जागा नाही, लेकरांसाठी जेवण नाही अशा परिस्थिती लहान बाळांना घेऊन दूर दूरवरून आलेल्या महिलांच्या हातात फाटक्या साड्या टेकवण्यात आल्या. त्या साड्या बघून महिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला व त्यांनी आयोजन करणाऱ्या नेत्यांना फटकारले.