बिहारचे ‘सिंघम’ IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा, महाराष्ट्राशी काय आहे कनेक्शन?

बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असलेले IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी राजीनामा दिला. लांडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढे त्यांनी आपण बिहारमध्ये राहणार असल्याचेही म्हटले आहे. वैयक्तिक कारणातून आपण नोकरीचा राजीनामा दिल्याचे शिवदीप लांडे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

‘माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा जवळचं मानलं आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (IPS) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवदीप लांडे यांनी बिहारमधील चार राज्यात अंमली पदार्थविरोधी ठोस पावले उचलत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. शिवदीप लांडे यांची नुकतीच पूर्णिया आयुक्तालयाचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पदभारही स्वीकारला होता.

शिवदीप लांडे मूळचे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अत्यंत बिकट परिस्थिती असताना लांडे यांनी स्कॉलरशीप मिळवून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी परिक्षेतही टॉपर आले. आयपीएस झाल्यानंतर त्यांना बिहार केडर मिळाले. बिहारमध्ये गेली 18 वर्षे ते IPS म्हणून कार्यरत होते.