भंडारा – ST बँकेच्या सभेत मोठा गोंधळ, गुणरत्न सदावर्तेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करत विरोधक आक्रमक

भंडारा येथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. गुणरत्न सदावर्ते यांनी या बँकेत मोठा अपहार केल्याचा आरोप एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या सभेत आक्रमक झालेल्या दोन्ही पॅनेलच्या सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली व खुर्च्या एकमेकांवर फेकल्या.

या बँकेच्या वार्षिक अंकावर प्रभू श्री रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह नथुराम गोडसे यांचा फोटो देखील लावण्यात आला होता. त्यावरून या सभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. विरोधी पॅनेलने हे अंक फाडून टाकले. तसेच सदावर्ते यांनी बँकेत केलेल्या अपहाराविषयी सत्ताधारी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलला जाब विचारला. त्यावरून दोन्ही पॅनेलमध्ये वादावादी झाली.

गुणरत्न सदावर्तेंवर भ्रष्टाचाराचे आरोप

गुणरत्न सदावर्ते यांनी बँकेतून 35 लाख रुपये लुटले आहेत. बँकेत 34 कोटींचं जे डेटा सेंटर आणलं त्यातही त्यांनी अपहार केला आहे, असा आरोप एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. ”सदावर्ते यांनी या बँकेत बाहेरचे सभासद आणण्याचा डाव रचला आहे. जर तसे झाले तर बँक बुडण्याचा धोका आहे. आजही त्यांनी कुठल्याही नियम कायद्यानुसार बैठक बोलावली नव्हती. सदावर्ते यांनी बँकेतून 35 लाख रुपये लुटले आहेत. बँकेच्या डेटासेंटरमध्येही त्यांनी घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित केला असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले.