मिंध्यांना शेतकर्‍यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, जयस्तंभ चौकात मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसचे काळे झेंडे

काँग्रेसने ठरल्याप्रमाणे जयस्तंभ चौकात निषेध आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापुर्वी काँग्रेसचे प्रदेश सचिव जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या सहकार्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जयस्तंभ चौकांत शेतकर्‍यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी राहुल बोंद्रे यांना अडविले. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत शेतकर्‍यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन फाटले. यावेळी पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र मुस्लीम माजी नगरसेवकांनी जयस्तंभ चौकात मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवले.

काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौर्‍याला या अगोदरच विरोध करीत काळे झेंड दाखवण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या काही तास अगोदर काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह जयश्री शेळके, दत्ता काकस, अंकुश देशमुख, गजफरखान, तुषार खरे, शेख मुज्जु, सय्यद उबैद, अभय सोनुने, विजय मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सपकाळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हे सरकार आम्हाला घाबरते म्हणून पोलिसांना समोर करुन आम्हाला अटक केली आहे. पोलिसांची दडपशाही व जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे. चार कोटी एवढा मोठा खर्च मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर होत आहे. याचा सुद्धा त्यांनी निषेध केला. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी 250 शेतकर्‍यांनी रक्ताने सह्या केलेल्या निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. या निवेदनात सोयाबीन, कापसाला भाव मिळावा, शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, थकलेला पिक विमा मिळावा अशा मागण्या होत्या. परंतु पोलिसांनी भेट नाकारली. तेव्हा राहुल बोंद्रे व त्यांच्या समर्थकांनी जयस्तंभ चौकात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून निवेदन देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे व त्यांचे सहकारी त्यांना अडवत होते. अखेर पोलिसांशी बोंद्रे यांची झटापट झाली. त्यात शेतकर्‍यांच्या रक्ताने केलेल्या सह्यांचे निवेदन फाटले.

पोलिसांनी राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकार्‍यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकर्‍यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे. परंतु काँग्रेसच्या बुलढाणा येथील माजी नगरसेवक बबलु कुरेशी, जाकीर कुरेशी, महमद सोफीयान, महमद दानिश यांनी पोलिसांची नजर चुकवत जयस्तंभ चौकात मुख्यमंत्र्यांविरुद्ध नारेबाजी करीत काळे झेंडे दाखवले, त्यावेळी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.