रशियाच्या विरोधानंतरही हिंदुस्थानचा दारूगोळा युक्रेनमध्ये दाखल?

रशिया-युक्रेन युद्धात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाने आक्षेप घेतल्यानंतरही हिंदुस्थानचा दारूगोळा युक्रेनमध्ये दाखल झाला आहे. हिंदुस्थानी शस्त्रास्त्र निर्मात्यांद्वारे विकला जाणारा दारूगोळा युरोपियन खरेदीदारांनी युक्रेनला पुरवला आहे. रशियाच्या विरोधानंतरही हिंदुस्थानने हा शस्त्रास्त्र व्यापार थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही, असे हिंदुस्थानी आणि युरोपियन सरकार आणि संरक्षण उद्योग क्षेत्रातील अकरा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी हिंदुस्थान आणि रशियाच्या परराष्ट्र आणि संरक्षण विभागाने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याचे रॉटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.

एनडीटीव्हीनं यासंदर्भात वृत्तप्रसिद्ध केलं आहे. रशिया विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत युक्रेनला गेल्या वर्षभरापासून दारूगोळ्याचा पुरवठा होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने आतापर्यंत दोन वेळा हिंदुस्थानकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. जुलैमध्ये रशिया आणि हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यावेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी सांगितले. दारूगोळा हस्तांतरणाची माहिती रॉयटर्सने प्रथमच दिली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिला विदेश दौरा हा रशियाचा केला होता. त्यानंतर जुलैमध्ये कझाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्या बैठक झाली होती. त्यावेळीही रशियाने युक्रेनला पुरवल्या जाणाऱ्या दारूगोळ्याचा मुद्द्यावर आक्षेप नोंदवला होता. यावर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय भूमिका मांडली? हे मात्र अधिकाऱ्यांनी उघड केले नाही.

हिंदुस्थानमधील दारूगोळा हा युक्रेनमध्ये गेल्याचा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला जानेवारीमध्ये एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. हिंदुस्थानने युक्रेनला तोफगोळ्यांचा पुरवठा केला नाही किंवा त्यांची विक्रीही केली नाही, असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले होते. युक्रेन वापरत असलेला दारूगोळा हा हिंदुस्थानात अतिशय कमी प्रमाण निर्मित केला जातो. युक्रेनने आयात केलेल्या एकूण शस्त्रास्त्रांच्या तुलनेत याचे प्रमाण फक्त 1 टक्का आहे, अशी माहिती दोन हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी आणि संरक्षण उद्योगातील सूत्रांनी दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

युक्रेनला इटली आणि झेक रिपब्लिक या देशांकडून हिंदुस्थानी तोफगोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती स्पॅनिश आणि हिंदुस्थानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. हिंदुस्थानकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे हिंदुस्थानच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच युरोपमध्ये होणारा दारूगोळा पुरवठा रोखण्याबाबत हिंदुस्थानच्या सरकारने कुठलीही कारवाई केलेली नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी युक्रेन, इटली, स्पॅनिश आणि झेक रिपब्लिकच्या संरक्षण विभागाने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, हिंदुस्थानने 2018 ते 2023 दरम्यान 3 अब्ज डॉलर्सहून अधिकच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केल्याचा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट थिंक-टँकच्या आकडेवारीतून करण्यात आला आहे.