केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांची हकालपट्टी करा; राहुल गांधींबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसची मागणी

केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेसने बिट्टू यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच भाजपश्रेष्ठी याविरोधात कारवाई करत नसल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला होता. आता दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी बिट्टू यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे बिट्टी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. भाजपला राहुल गांधींना वाढता पाठिंबा आणि जनतेचा मिळणार कौल याची धास्ती वाटते, त्यामुळे अशी विधाने करण्यात येत आहेत. मात्र, राहुल यांच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्ते आणि देशातील जनता ठामपणे उभी आहे. आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रवनीत सिंग बिट्टू यांनी शीखांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते हिंदुस्थानी नाहीत. ते दहशतवादी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसह विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता काँग्रेसने बिट्टू यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. लोकशाही तेव्हाच कार्य करू शकते जेव्हा राजकीय पक्षांमध्ये “मूलभूत आदर” असेल आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना “वैचारिक विरोधक, वैयक्तिक शत्रू” म्हणून वागवले जाईल, असे काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.