US Fedral Reserve चा व्याजदराबाबतचा निर्णय; शेअर बाजाराची घोडदौडीला सुरुवात

जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि जागतिक शेअर बाजारावर असलेला दबाव बघता मंदीची शक्यता काही तज्ज्ञ वर्तवत आहेत. असे असतानाही हिंदुस्थानी शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आहे. आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर जगातील जवळपास सर्वच शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.

देशातील मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची सुरुवातही दमदार तेजीत झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाला गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बाजारात तेजी आली आहे. गुरुवारी बाजाराची सुरावत होताच प्रिमार्केट वेळेतही निर्देशांकांची सुरुवात दमदार झाली. त्यानंतर बाजाराची सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 633अंकांनी वाढून 83,581.79 वर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 180 अंकांनी वाढून 25,562.85 वर पोहचला होता. तर बँक निफ्टीचा निर्देशांक 465 अंकांनी वाढून 53,216.10 वर व्यवहार करत होता.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं दोन दिवसांच्या बैठकीनंतर बुधवारी व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा केली. मार्च 2020 नंतर प्रथमच व्याजदरात कपात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या व्याजदरात कपातीचा परिणाम गुरुवारी देशासह जगभरातील शेअर बाजारात दिसून आला आहे. जगातील जवळपास सर्वच शेअर बाजार तेजीत आले आहे. ही तेजी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात केल्यानं अमेरिकेतील सरकारी बॉन्ड्सवरील व्याजदरही कमी होतील. त्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा बॉन्ड्समध्ये गुंतवण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. फेडरलच्या या निर्णयानं भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढू शकते. त्यामुळे ही तेजी आणखी काही दिवस कायम राहणार असून हिंदुस्थानी शेअर बाजाराची घोडदौड कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सोन्यालाही मिळणार झळाळी
जागतिक शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम सोन्याच्या दरावरही हेत असतो. फेड रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याच्या निर्णयानंतर सोन्याच्या दरातही तेजी येण्याची शक्यता आहे. सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. व्याजदरात कपात झाल्याने अमेरिकन गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील. यामुळे सोन्याची दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.