मुरबाडमध्ये कंत्राटदाराचा पेव्हरब्लॉक घोटाळा, काम अपूर्ण ठेवून चक्क दहा लाखांच्या बिलावर डल्ला

चिखलाच्या राडारोड्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने मुरबाडच्या कुडवळी औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेत दहा लाखांचा निधी मंजूर केला. मात्र प्रत्यक्षात काम अपूर्ण असताना चक्क दहा लाखांची बिले खिशात घालण्यात आली आहेत. याबाबत काही नागरिकांनी तक्रारी करत चौकशी मागणी केली आहे. मात्र या तक्रारींना अधिकारी केराची टोपली दाखवत आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे ठेकेदाराबरोबर साटेलोटे असल्यानेच मिंधे-भाजपच्या मर्जीतील लाडक्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याचा आरोप होत आहे.

बगलबच्च्यांना पोसण्यासाठी कंत्राटे मुरबाडमध्ये कोट्यवधींच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून अनेक कामात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अनेक ठेकेदार सत्ताधारी बीजेपी आणि मिंधे गटाचे असल्याने या बगलबच्च्यांना पोसण्यासाठीच ही कंत्राटे काढली जात आहेत, असे आरोप होत आहेत. दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या घराबाहेर, शौचालयाच्या पुढे माघे पेव्हरब्लॉक बसवले जात असताना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची वाट लावली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

घाटची अनेक कामेही बोगस असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे या कामाची चौकशी केली जात नाही. त्यातच आता बांधकाम खात्याचा नवीन कारनामा समोर आला आहे. कुडवळी औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करावा लागत असून पावसाळ्यात तर चिखलाचा राडारोडा तुडवत जावे लागते. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर या कामासाठी दहा लाखांच्या पेव्हरब्लॉकचे काम मंजूर करण्यात आले. वास्तविक अंदाज पत्रकानुसार ५५ ते ६० ब्रास काम करणे अपेक्षित असताना या ठिकाणी ठेकेदाराने प्रत्यक्षात जवळपास सात ते आठ ब्रासचे काम करून वेळ मारून नेली आहे. इतकेच नाही तर अधिकारांच्या संगनमताने मुरबाड तालुक्यात रस्ते, साकाव, बंधारे, संरक्षण भिंती तसेच गणेश चक्क दहा लाख बिल काढून शासनाला चुना लावला आहे.