कामे अडवून माणूस मोठा होत नाही! मंदा म्हात्रे यांचा भाजप आणि मिंधे गटाला टोला

विकासकामे केल्यानंतर माणसे मोठी होतात, कामे अडवून कधीच मोठी होत नाहीत. हे जरी वास्तव असले तरी नवी मुंबईतील नेत्यांना कामे अडवण्यातच जास्त रस आहे. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. श्रेयवादाच्या या लढाईत भूमिपुत्रांच्या नियमित होणाऱ्या या घरांमध्ये अडथळा आणू नका, असा टोला भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजप आणि मिंधे गटाला लगावला आहे.

विधानसभा निवडणूक जवळ येत असताना नवी मुंबईत आता धोकादायक इमारतींच्या मुद्यापाठोपाठ भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप आणि मिंधे गटाच्या जोरबैठका सध्या सुरू झाल्या आहेत. यावर भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी महायुतीमधील त्यांच्या सहकाऱ्यांना जोरदार चपराक लगावली आहे.

नवी मुंबईच्या विकासासाठी मी अनेक प्रकल्प आणले. येथील नेत्यांकडून ते अडवण्यात आले. मरिना प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून लटकवून ठेवण्यात आला आहे. महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या भूमिपुत्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रशासन आढेवेढे घेत आहे. हे कुणाच्या इशाऱ्यावरून होत आहे, हे संपूर्ण नवी मुंबईला माहिती आहे. लोकांच्या हिताची कामे अडवून कोणीच मोठा होत नाही, हे विकासात आडकाठी आणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. शहरातील नागरिक त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असाही इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधींनीच शहर विद्रुप केले

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात शहरात संख्येने बॅनर्स लागल्यामुळे शहर विद्रुप झाले. विशेष म्हणजे या विद्रुपीकरणाला लोकप्रतिनिधीच जबाबदार होते. एका चौकात एकाच नेत्याचे चार चार बेकायदा बॅनर्स लावण्यात आले होते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने बॅनर्सचे डिझाईन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ज्यांचे बॅनर्स लावण्यात आले त्यांच्यावर कारवाई करा. वेळ पडली तर माझ्यापासून करा, अशी मागणी महापालिका कारवाई आहेत, सुरुवात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे करण्यात आली असेही मंदा म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.