भिवंडीत विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

वाजत-गाजत, जल्लोषात गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना शहरातील वंजारपट्टी या भागात काही समाजकंटकांनी रात्री उशिरा दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाने घोषणाबाजी सुरू केल्याने बाचाबाची वाढू नये म्हणून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात एका पोलिसासह चौघेजण जखमी झाले असून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान भिवंडीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

दंगल नियंत्रण पथक दाखल
मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हनुमान मित्रमंडळाची गणेशमूर्ती वंजारपट्टी नाका येथे आली असता घुंघटनगर येथे काही अज्ञात व्यक्तींनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर काहींना मारहाणदेखील केली. घोषणाबाजी तसेच दगडफेक सुरू असल्याने तणाव आणखी वाढण्याची भीती होती. जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. सदर घटना समजताच सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला.

वंजारपट्टी भागातील दगडफेकीचे पडसाद शहरातील अन्य भागांत उमटू नयेत म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले असून या दगडफेकीमध्ये काही नागरिकही जखमी झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेनंतर आज सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य पुरावे तपासल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.