ठाणेकर जपणार पर्यावरणाचा वसा; 32 टन निर्माल्याचे खत बनवणार

गणपती बाप्पा मोरया.. निर्माल्यापासून खत बनवूया, असा निर्धार करत ठाणेकरांनी पर्यावरणाचा वसा जपला आहे. यंदाच्या वर्षी ठाणेकरांनी निर्माल्य संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसात दिला असून कोणत्याही विसर्जन घाटावर निर्माल्याचे पाण्यात विसर्जन केलेले नाही. यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन घाटांवर उभारलेल्या कलशांमधून तब्बल 32 टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यावर कोपरी येथील प्रकल्प पुनर्निर्माण येथे या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे.

अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष करत भाविकांनी जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यंदा महापालिका क्षेत्रात 10 दिवसांच्या तब्बल 8523 गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यात 321 सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूतींचाही समावेश होता. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी पालिकेने सुसज्ज गणेश घाटांसोबत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, फिरता विसर्जन घाट व निर्माल्य कलश उभारले होते. भाविकांनी मोहिमेला प्रतिसाद देत वाहत्या पाण्यात निर्माल्याचे विसर्जन न करता निर्माल्य कलशाचा वापर केला. या निर्माल्य कलाशातून दीड दिवस गणपती विसर्जनावेळी 12 टन, सहाव्या दिवशी 13 टन तर अखेरच्या दिवशी 07 टन असे एकूण 32 टन निर्माल्य जमा करण्यात आले आहे. समर्थ भारत व्यासपीठ यांनी ‘हर बार इको त्योहार’ ही मोहीम राबवत रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी व ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने मासुंदा, ठाणे पूर्व, रेतीबंदर, रायलादेवी येथील गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलित केले. सण-उत्सव पर्यावरण स्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ गेल्या 14 वर्षांपासून ही मोहीम राबवत आहे.

प्लास्टिक व थर्माकोलचा वापरा कमी
पालिकेच्या जनजगृतीमुळे सजावट आणि देखाव्यांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व थर्माकोलचा वापर कमी झाला. व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर 95 टक्कांनी कमी झाला आहे. यासोबत शाडू मातीच्या मूर्ती वापरणे, मूर्तीचा आकार लहान ठेवणे, घरच्या घरी तसेच सोसायटीत अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करणे अशा विविध योजना राबवल्यामुळे ते शक्य झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संकलित निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे. या तयार केलेल्या खताचा वापर पालिकेच्या उद्यानांमध्ये केला जाणार आहे.