महायुतीच्या वाचाळवीरांकडून राजकारणाचा चिखल, बाळासाहेब थोरात यांची टीका

भाजप आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग 2014 ला सुरू झाला तो आता रोज खालच्या पातळीवर जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पाठोपाठ भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे जाहीर विधान केले होते. या विधानावरून गायकवाड यांच्यावर जोरदार टीका होत असताना डॉ. बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी महायुतीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी आज एक्सच्या माध्यमातून डॉ. बोंडे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा असून हे अत्यंत धोकादायक आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याएवढेच दोषी आहेत. गायकवाड आणि बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच, पण यांच्या कर्माची फळं त्यांना पाठीशी घालणाऱया नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत, असा इशारा थोरात यांनी दिला आहे.