महाराष्ट्राला पुन्हा तारीख, आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलली

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंधे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा पुढे ढकलली. शिवसेनेने सादर केलेली भक्कम कागदपत्रे तसेच युक्तिवादाच्या नोट्समुळे गद्दार मिंधेंचा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फैसला होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुधवारच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र वेळेअभावी सुनावणीच होऊ न शकल्याने महाराष्ट्राला पुन्हा ‘तारीख’ मिळाली.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले नाही. नार्वेकर यांच्या त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध झाली होती. शिवसेनेने मिंधे गटाच्या आमदारांची अपात्रता सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे यापूर्वीच न्यायालयात सादर केलेली आहेत. शिवसेनेत फूट पाडून मिंधे गटात गेलेल्या गद्दार आमदारांना अपात्र न करण्याचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय पूर्णपणे बेकायदा व विपृत आहे, असे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार होती, मात्र खंडपीठाने वेळेअभावी सुनावणी पुन्हा तहकूब केली.

जानेवारीपासून ‘तारीख पे तारीख’

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेने जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिका दाखल होऊन नऊ महिने उलटत आले आहेत. या नऊ महिन्यांत अनेकदा ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरू राहिल्याने सुनावणी लांबली आहे. न्यायालय याबाबत अंतिम निकाल कधी देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.