पवई तलाव येथे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे हाल

पालिकेच्या एस वॉर्ड अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी पवई तलाव येथे आलेल्या गणेश मंडळ आणि भक्तांचे खूप हाल झाले. विसर्जन रांगेचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे अनेक भाविकांना पहाटेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले.

पालिकेमार्फत गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांसाठी गणेशमूर्ती पाच फूट, पाच ते दहा फूट आणि दहापेक्षा जास्त याप्रकारे तीन रांगांची आवश्यकता होती, मात्र तिन्ही रांगांमध्ये लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पवई तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जनास आलेल्या भाविकांना पहाटेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

पालिकेमार्फत गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्तींसाठी क्रेनची मोफत सुविधा असतानासुद्धा ठेकेदार मंडळाकडून पैसे उकळत होते. याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही मंडळांनी रक्कम देण्यास नकार केल्यामुळे अर्धा ते एक तास गणेश विसर्जनाला विलंब झाला होता. त्यातच साकीनाका वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले.

मेट्रो प्रशासनाचा हलगर्जीपणा

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वारंवार सूचना देऊनदेखील मेट्रो प्रशासनाने सात रस्ता येथील विसर्जन मार्गावर योग्यरीत्या काम केले नाही. नाइलाजाने बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी विरुद्ध दिशेने घेऊन जाण्याची वेळ मंडळांवर आली. त्यातच समोरून येणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी त्या टप्प्यात कोणतेही पोलीस अधिकारी हजर नसल्याने सात रस्ता सर्कल आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळ या मधल्या टप्प्यात वाहतूककोंडी झाली. याचा फटका विसर्जन मिरवणुकांना बसला.