पुढच्या वर्षी लवकर या… बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी अन् फटाक्यांच्या आतषबाजीत मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला…’ अशा जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमला होता. गेले दहा दिवस भक्तिभावाने बाप्पाची पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले.

गिरगाव, दादर, वरळी, जुहू, वर्सोवा, मढ, मार्वे अशा चौपाट्यांसह 200 हून अधिक कृत्रिम तलावांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी चौपट्यांवर भाविकांची गर्दी उसळली होती. मुंबईत आज सकाळपर्यंत 6315 सार्वजनिक, 31,011 घरगुती तसेच 208 गौरी अशा 37 हजार 534 गणेशमूर्तींसह गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 11 हजार 364 मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.

मुंबईत दोन लाखांहून अधिक घरगुती तर 12 हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. गणेशोत्सवात दहा दिवस पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी बाप्पा आपल्या गावी गेले. बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिका, पोलीस प्रशासनासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. मंगळवारी सकाळपासूनच विसर्जन मिरवणूक सुरू झाल्या.

‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘तेजुकायाचा राजा’, ‘काळाचौकीचा महागणपती’, ‘रंगारी बदक चाळ’, ‘परळचा राजा’ असे लालबाग- परळमधील मानाचे गणपती पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी झाली होती. गल्लोगल्ली आणि नाक्यानाक्यावरदेखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी गिरगावसह शहरातील इतर चौपाट्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, तर काही रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली होती. नाक्यानाक्यावर तसेच रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. विसर्जनस्थळी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेचे सुमारे 12 हजार अधिकारी-कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज होते. सुरक्षेच्या दृष्टीने 761 जीवरक्षकांसह 48 बोटी तैनात होत्या. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांचे खासकरून चिमुकल्यांचे डोळे पाणावले होते.

साडेपाचशे मेट्रिक टन निर्माल्य संकलन

गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पालिकेने विविध चौपाट्यांवर, समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. त्याद्वारे 363 मेट्रिक टन घनकचरा संकलन करण्यात आले. चौपाट्यांवर दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव अशी सर्व मूर्ती विसर्जन स्थळे मिळून सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.

या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे. यंदा मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठी 500 हून अधिक निर्माल्य कलश आणि 350 निर्माल्य वाहक वाहने नेमलेली होती.

14 हजार 370 बॅनर हटवले

विसर्जन सोहळा आटोपल्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून पालिकेने बॅनर, फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 14 हजार 370 इतके साहित्य काढून टाकण्यात आले आहे. बेकायदेशीर बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तिपत्रके अशा सर्व बाबींचादेखील या कार्यवाहीमध्ये समावेश आहे.

शिवसेनेमुळे चेंबूरमधील गणेशभक्तांना दिलासा

चेंबूरमधील आशीष तलावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या सात फुटांवरील बाप्पाच्या विसर्जनासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने आरसीएफ प्रशासनाकडे केली होती. शिवसेनेची ही मागणी मान्य झाल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी येथे येणाऱ्या चेंबूर परिसरातील शेकडो मंडळांना दिलासा मिळाला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सात फुटावरील बाप्पाचे विसर्जन आशीष तलावात करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी अणुशक्ती नगर वॉर्ड क्र. 147 च्या माजी नगरसेविका अंजली नाईक यांनी आरसीएफ प्रशासनाकडे केली होती. त्याप्रमाणे आरसीएफ प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर अंजली नाईक यांनी आरसीएफ प्रशासन व आरसीएफ पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत.

‘लालबागच्या राजा’चे 24 तासांनी विसर्जन

देशविदेशातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मंगळवारी सकाळपासून लालबागमध्ये गर्दी उसळली होती. तब्बल 24 तास राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि हार घालून राजाचे जोरदार स्वागत करण्यात आले. पूल, डिव्हायडर, खिडकी, गच्ची अशा मिळेल त्या जागी उभे राहून भाविक कुटुंबकबिल्यासह राजाचे दर्शन घेताना दिसत होते.

बुधवारी सकाळी मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल होताच लाखोंचा जनसमुदाय ‘लालबागचा राजा’च्या स्वागतासाठी उपस्थित होता. त्यानंतर ‘लालबागचा राजा’ तराफ्यावरुन खोल समुद्रात उतरवण्यात आला. ‘लालबागचा राजा’ हळूहळू पाण्याखाली जाताना भाविक डोळे भरून त्याचे रूप डोळ्यात साठवत होते.