आभाळमाया – ‘हॅप्पी बर्थ डे… सुनीता!’

पूर्ण अभ्यासाविना भरपूर चर्चा केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर रंगतात. सुनीता विल्यम्स आणि वॅरी किंवा बच विल्मोर हे दोन अंतराळयात्री गेल्या 5 जूनला अवघ्या आठवडय़ाभरासाठी स्पेसमध्ये गेले आणि बोईंग कंपनीच्या ज्या स्टारलायनरने त्यांना अंतराळात नेलं त्याचे काही बुस्टर वाटेतच बिघडले. साहजिकच या दोघांचं काय होणार याची चिंता जगाला लागली. त्यातही बूच विल्मोर तर पहिल्यांदाच अंतराळात गेलेला. परंतु सुनीता ही वडिलांकडून पंडय़ा म्हणजे भारतीय वंशाची (इंडियन ओरिजिन) असल्याने तिची चर्चा आपल्याकडे जास्त होणेही स्वाभाविक. मात्र ती कल्पना चावलासारखी हिंदुस्थानात जन्मलेली आणि वाढलेली नाही. तिचा जन्म 19 सप्टेंबर 1965 या दिवशी ओहायो राज्यातल्या युक्लिड येथे झाला. बालपणीच ती मॅसेच्युसेट्स राज्यात गेल्याने तेच तिला तिचं होमटाऊन वाटतं. तिची आई अर्सुनिन बॉनी आणि वडील दीपक पंडय़ा. ते गुजरातमधल्या महेसाणा जिह्यातले. असं तिचं हिंदुस्थानशी नातं. तर अशा या हिंदुस्थानी पितृवंशाच्या आणि आतापर्यंत वेळोवेळी अंतराळातील स्पेस स्टेशनवर एकूण 427 दिवस राहिलेल्या तसेच सध्याही स्पेस स्टेशनवर ‘अडकलेल्या’ सुनीताचा आज 59 वा वाढदिवस. तेव्हा सर्वप्रथम तिला पाश्चात्त्य पद्धतीने ‘हॅप्पी बर्थ डे’ म्हणूया आणि पुढच्या अनेक सुखरूप अंतराळ प्रवासासाठी आपल्या संस्कृतीनुसार ‘जीवेत् शरदः शतम्’ अशीही सदिच्छा देऊया.

जगाला सुनीताची जेवढी काळजी वाटतेय आणि काही चॅनलवरून तिच्याविषयीच्या धास्ती वाढवणाऱया बातम्या येतायत त्यापासून ती अलिप्त आणि सुरक्षित आहे. ‘स्टारलायनर’ने दगा दिल्यानंतरही स्पेस जर्नीचा पुरेसा अनुभव असल्याच्या शिदोरीवर सुनीता, तिचा सहकारी बॅरी विल्मोरसह यशस्वीरीत्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल झाली तेव्हा वैज्ञानिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर मात्र ते स्टारलायनर दुरुस्त होणार की नाही? झालंच तर त्यात पुन्हा काही गडबड तर होणार नाही ना? या दोघांना पृथ्वीवर येण्यासाठी पुरेसा ठरेल इतका ऑक्सिजन असेल का? 25 फेब्रुवारीपर्यंत स्पेस स्टेशनवरच राहावं लागलं तर तिथे तरी एवढा प्राणवायूचा साठा असतो का? या दोघांमुळे आधीच तिथे असलेल्या सात जणांत दोघांची भर पडली तर खाण्यापिण्याची काय सोय? असे प्रश्न अनेकांना पडलेत.

सुनीता आणि बॅरी यांची अंतराळस्थानकावरची व्हिडीओ मुलाखत पाहिलेल्यांना तरी अशा कुशंका यायला नकोत. दोघंही अतिशय आनंदात आहेत. थोडा दुरुस्तीचा आणि काही नव्या प्रयोगांचा त्यांचा दिनक्रम (अमेरिकन भाषेत स्केडय़ुल) उत्तम चाललाय. दोघं अगदी उत्साहात आहेत आणि इथे काही बातम्या काय, तर सुनीताचं वजन घटतेय किंवा ती नर्व्हस झालीय वगैरे. कुठून पिकतात अशा बातम्या ठाऊक नाही, पण चर्चाचर्वण होतं खरं.

90 मिनिटात पृथ्वीभोवती परिक्रमा करणारं म्हणजे 45 मिनिटांचा दिवस आणि तेवढीच रात्र वेगाने अनुभवणारं हे स्पेस स्टेशन बहुधा नोव्हेंबरनंतरच्या रात्रीच्या स्वच्छ आकाशात आपल्यालाही दिसतं. आम्ही ते अनेकदा पाहिलंय. कारण तसं ते पृथ्वीपासून खूपच जवळ म्हणजे केवळ 400 किलोमीटरवरून अवकाशात भ्रमण करतंय. साधारण फुटबॉलच्या मैदानाएवढय़ा आकाराचं हे स्पेस स्टेशन एकाच वेळी अवकाशात नेणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याची विविध भागांतील पाठवणी आणि अंतराळातच जुळणी करावी लागली. सध्या 5 देशांच्या सहकार्यातून हे अवाढव्य स्पेस स्टेशन अंतराळात भिरभिरतंय.

सध्या अंतराळस्थानकावरच काही वनस्पती वाढवण्याची सोय आहे. तसेच सुकं खाद्य आणि पुरेसे कपडे सुनीता आणि बॅरी यांनी नेलेले आहेत. ‘स्पेस-एक्स’चं ड्रगन अंतराळयान या दोघांना फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर आणेपर्यंत त्यांना खाण्यापिण्याची पंचाईत नाही. शिवाय उच्छ्वासातील कार्बनडायॉक्साइडमधला प्राणवायु वेगळा करण्याची यंत्रणा तसंच उत्सर्जित आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवण्याची यंत्रणाही अंतराळस्थानकावर आहेच. त्यामुळे काळजीचे कारण नसावे.

सुनीता (किंवा बॅरी) यांची सर्वाधिक काळजी कोणाला वाटत असेल तर त्यांच्या घरच्या मंडळींना, पण ती तर निवांत दिसतात. सुनीताचे पती मायकेल तर म्हणतात की, ‘स्पेस स्टेशन ही तिची आनंदाची जागा आहे.’ सुनीतानेही स्पेस स्टेशनवर पोचल्यावर ‘घरी आल्यासारखं वाटतं’ अशीच प्रतिक्रिया दिली होती.

सुनीताची आई बॉनी पंडय़ा या अतिशय धीराच्या आहेत. त्या सांगतात की, मी एक अंतराळयात्रीची आई आहे. मी तिला कुठलाही सल्ला देणार नाही. कारण अंतराळात कसं राहावं याचा तिला प्रदीर्घ अनुभव आहे. आणि सुनीतानेही आईशी संवाद साधताना काही काळजी करू नको, मी मजेत आहे, असं म्हटलंय. बॅरी बिल्मोरची प्रतिक्रियाही वेगळी नाही. त्यामुळे त्यांचं मनोधैर्य उत्तम असताना बाकीच्यांनी तर्क-कुतर्क लढवण्याची गरज नाही. हा प्रवास धोकादायक आणि आव्हानात्मक हे अंतराळयात्री जाणतात.

…तेव्हा एका जुन्या हिंदी गाण्यातील ‘सुनीता’ नावाच्याच नायिकेला दिलेल्या शुभेच्छा देऊ या.
‘बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये, सबकी है आरजू… हॅप्पी बर्थ डे टू यू… सुनीता!’