कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीने पालये येथे गळफास लावून जीवन संपवले

पालये येथे बागेत काम करीत असलेल्या कातकरी कुटुंबातील सानिका प्रकाश पवार(12) या मुलीने शेतमांगराच्या लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आई-वडील बागेत काम करून दुपारी दीड वाजण्याचा सुमारास जेवणासाठी घरी आल्यानंतर ही घटना समोर आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोंड निकमवाडी येथील प्रकाश पवार आणि त्यांचे कुटुंब गेली दोन वर्षे पालये येथील गोकूळ आंबेरकर यांच्या बागेत कामासाठी असून त्यांच्या बागेत असलेल्या चिरेबंदी शेतमांगरामध्येच ते वास्तवास होते. बुधवारी सकाळी प्रकाश पवार, त्यांची पत्नी व छोटे दोन मुलगे त्यांच्या समवेत बागेतच काम करण्यास गेले यावेळी मुलगी सानिका ही घरात एकटीच होती. सकाळी साडे अकराच्या सुमारास पवार ते घरी नाष्टा करण्यास आले त्यावेळी मुलगीही घरीच होती. नाश्ता करून ते पत्नी व मुलांसमवेत पुन्हा बागेत कामाला गेले तर मुलगी सानिका ही घरी होती. दुपारी पवार हे दीड वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी आल्यानंतर घरातील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मुलगी सानिका ही दिसली. त्यांनी याबाबत बागमालक यांनी कल्पना दिल्यानंतर त्यांनी देवगड पोलिस स्टेशनला कळविले. पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पो.हे.कॉ.आशिष कदम, होमगार्ड समुपदेशक मंगेश जाधव यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती मात्र अल्पवयीन मुलींने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही.